पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर महिला कलाकारांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय रंगधर्मी पॅनलने एकमताने घेतल्याची माहिती या पॅनलच्या उमेदवार शुभांगी दामले व भाग्यश्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या रविवारी होणाऱ्या या निवडणुकीत रंगधर्मी पॅनलला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असून, विजय निश्चित होणार असल्याचे या वेळी सांगितले. या वेळी पॅनलचे मार्गदर्शक व नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, प्रमोद आडकर व अन्य उमेदवार उपस्थित होते.
दामले यांनी सांगितले, की रंगधर्मी पॅनलला -सिने क्षेत्रातील विविध मान्यवरांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, सिने व नाट्य कलावंत डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, सुचेता चाफेकर, डॉ. नीलेश रावळे, प्राजक्ता माळी व अन्य अनेक कलावंतांनी रंगधर्मी पॅनलला जाहीर पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी रंगधर्मीच्या जाहीरनाम्याबाबत परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यकारिणीने विविध पावित्र्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन शाखेच्या कार्याचा विस्तार केला होता. परिषदेच्या कार्यालयाचे नूतनीकरण, डॉ. श्रीराम लागू, लालन सारंग, श्रीकांत मोघे, प्रभाकर पणशीकर व अन्य काही कलावंतांच्या डीव्हीडी तयार करून नाट्यक्षेत्राचा वारसा जतन करण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ कलावंत, पडद्यामागचे सहायक यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले.