पुणे : मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हे सरकार लवकर पडेल असं काही लोक म्हणत होते. पण आता मंत्रिमंडळाचा विस्तार पण झाला आणि सरकारही मजबूत आहे. राज्याला महिला मंत्री नाही याबाबत जो आक्षेप घेतला जातोय. तो लवकरच दूर होऊन महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे हर घर तिरंगा या उपक्रमाच्या शुभारंभासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, आक्षेप घेणाऱ्यांनी सुद्धा पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले. त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काही अधिकार नाही. संजय राठोड यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने अशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केली होती. तसेच संजय राठोड यांच्यावरील गंभीर आरोप आणि अब्दुल सत्तार यांच्या टीईटी परीक्षेच्या प्रकाराबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.