पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्यावर चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी रोड परिसरात राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पद्मा, हरिता, ब्रीझ मिश्रा, मेघना अग्रवाल, विता अशी आरोपींची नावे आहेत. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअपवर मेसेज करत वर्क फ्रॉम होमचे काम आहे असे सांगितले. त्यामध्ये दिवसाला २ ते ५ हजार रुपये कमावता येऊ शकतात असा मेसेज होता.
तक्रारदाराने काम करण्यास सहमती दर्शवल्यावर त्यांना वेगवेगळे टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुरुवातील १ हजार रुपये मोबदला देऊन विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून एकूण १५ लाख ८२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यावर टेलिग्राम ग्रुपमधून काढून टाकल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. याप्रकरणी वरील आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ढवळे करत आहेत.