पुणे : शहरात ‘रेड डॉट’सारखी मोहीम राबवीत सॅनिटरी पॅड वेगळे बांधून कचऱ्यात टाकण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध कार्यालयांमध्ये सॅनिटरी पॅडचा कचरा टाकण्याची अथवा त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असून संतापही व्यक्त केला जात आहे.
ही परिस्थिती फक्त पालिकेच्या कार्यालयांमध्येच नव्हे तर शहरातील पोलीस ठाणी, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही आहे. स्वच्छ संस्थेकडून शहरातील घराघरांमधून कचरा गोळा केला जातो. हा कचरा गोळा करीत असताना अनेकदा सुक्या कचऱ्यातच सॅनिटरी पॅड टाकलेले असतात. हा कचरा हाताळताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हातालाही घाण लागते. यामुळे त्यांना गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छकडून ‘रेड डॉट’ मोहीम सुरू केली आहे. याद्वारे लोकांना वेगळ्या कागदात हे पॅड बांधून त्यावर लाल रंगामध्ये गोलाकार आकार रंगवून द्यावा अशी जनजागृती सुरू आहे.
शहरात एकीकडे या विषयावर जनजागृती करण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे पालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि संबंधित कार्यालये, रुग्णालयांमध्ये हा कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याचे महिलांनी सांगितले. स्वच्छतागृहातील कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होतोच. परंतु, महिलांनाही हा कचरा अन्य कचऱ्यात टाकताना मानसिक त्रास होत असल्याचे पालिकेच्या काही महिला अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वच्छतागृहांमध्ये त्याकरिता वेगळी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
--
पालिकेकडून शहरात काही ठिकाणी सॅनिटरी पॅडवर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले होते. या प्रकल्पांमध्ये हा कचरा जाळण्यासाठी छोटेखानी इनसिनीरेटर बसविण्यात आलेले आहेत. या ठिकाणी त्या त्या प्रभागातील जमा होणाऱ्या सॅनिटरी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
--
काही सामाजिक संस्थानी देणगी स्वरूपात विविध पोलीस ठाणे, पालिकेच्या कार्यालयांना सॅनिटरी पॅड प्रक्रिया मशीन दिलेले होते. परंतु, हे मशीनच काही ठिकाणाहून गायब झाले आहेत, तर जिथे आहेत ते बंद पडलेले आहेत.
--
पालिकेमधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच महिला नगरसेवकांची संख्या जवळपास ९० च्या पुढे आहे, असे असतानाही या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.