पुणे : कंपनीची संचालक असल्याचे सांगत गुंतवणुकीचे आमिष दाखवून चार वर्षांपासून महिलेची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अश्विनी मेलवाणी (रा. लिबर्टी फेज, कोरेगाव पार्क) यांनी रश्मी सोसायटी लेन नं. ५, कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये आरोपी महिलेने फिर्यादीबरोबर ओळख करून विश्वास संपादन केला. जी कंपनी अस्तित्वातच नाही त्या कंपनीची प्रोप्रायटर असल्याचे खोटे सांगून फिर्यादीला गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ६३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने येरवड्याच्या मणप्पुरम फायनान्स लिमिटेड शाखेत गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. त्या दागिन्यांवर १० लाख ३४ हजार रुपयांचे कर्ज उचलून ती रक्कम आरटीजीएसद्वारे आरोपी महिलेने त्यांच्याकडून घेतली. त्यावरील व्याजाची रक्कम भरण्यासाठी फिर्यादी यांच्या सोन्याच्या दागिन्यावर पुन्हा कर्ज उचलले आणि या रकमेचा अपहार करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. पवार करीत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
By admin | Published: April 24, 2017 5:09 AM