पुणे : पुणे जिल्हा परिषदेने महिलांच्या आरोग्यासाठी हाती घेतलेली प्रतिभासंपन्न आरोग्य योजनमुळे महिला सक्षमीकरण होणार असून ही योजना पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही सुरू करावी, अशी सूचना त्या महापालिकांच्या महापौरांना करणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या या योजनेचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते गुरुवारी अल्पबचत भवन येथे करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी पवार यांनी, ही योजना महाराष्ट्रात पुढे लागू केली पाहिजे, असे काम करा. मला विधिमंडळात चर्चा करताना अभिमानाने सांगता आले पाहिजे, की आमच्या जिल्ह्यातील महिला या १00 दिवसांच्या कार्यक्रमामुळे सक्षम झाली आहे. या वेळी त्यांनी २0१६ च्या लोकसंख्येचा विचार करता पुरुषांपेक्षा १ लाख ५२ हजार ८७६ महिला कमी आहेत. याबाबत चिंता व्यक्त केली. पुरुष व महिलांचे प्रमाण सारखे असले पाहिजे. मात्र, यात मोठी तफावत आजही दिसून येत आहे. हे प्रमाण भविष्यासाठी घातक होऊ शकते. तसेच राज्यातील कुपोषणाविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की कुपोषणाचे भयावह चित्र आहे. हे बदलायला हवे. सदृढ बालके जन्माला यावीत व त्यांना सकस आहार मिळावा, याकडे लक्ष द्या, अशा सूचना केल्या. शेवटी प्रतिभासंपन्न योजनेला आमच्या काकी यांचे नाव दिले आहे. त्यांच्या नावाला साजेशे काम करा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी, मी काही कामात कमी पडलो असेल. एखादे बांधकाम झाले नसेल,मात्र शाश्वत विकासात कुठेही कमी पडलो नाही, याचा आनंद आहे. आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक करीत आपला केंद्रांमध्ये २३ लाखांच्या पुढे ओपीडी गेली असल्याचा अभिमान आहे. जलयुक्त शिवार ही योजना जिल्हा परिषदेने केलेल्या कामामुळे ३० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. असे सांगत त्यांनी जिल्हा हगणदरीमुक्त होईपर्यंत आमचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यात कोणताही सत्कार स्वीकारणार नाहीत. आता जिल्हा हगणदरीमुक्त झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणार, अशी शपथ घेतली. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचीही भाषणे झाली. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, समाजकल्याण सभापती अतीश परदेशी, महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, कृषी सभापती सारिका इंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्या तृृप्ती खुटवड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘प्रतिभासंपन्न’ योजनेमुळे महिला सक्षम
By admin | Published: October 14, 2016 5:18 AM