पुणे - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवार (दि. ९ मार्च) ते रविवार (दि. ११ मार्च)दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष आहे.‘देशविदेशात भ्रमंती करणाºया प्रवासी महिला’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून, त्यावर आधारित चित्रपट महोत्सवात सादर केले जाणार असल्याची माहिती आयाम ग्रुपच्या मनस्विनी प्रभुणे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.शनिवारी (दि. १०) सकाळी १० वाजता सॅम मेंडेजदिग्दर्शित ‘अवे वुई गो’ हा चित्रपट व त्याच दिवशी दुपारी १२ वाजता अंडरे वेल्स यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंडर द टस्कन सन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता मार्टिन प्रक्कटदिग्दर्शित ‘चार्ली’ हा मल्याळम् भाषेतील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळेल. त्यानंतर प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांमधून अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया श्रीदेवी यांनाही महोत्सवात श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला ‘मुंदरम् पिराई’ हा तमीळ भाषेतील चित्रपट सायंकाळी ६ वाजता पाहायला मिळणार आहे.संकल्पना, विषय आणि चित्रपट मांडणी याला अनुसरून देशविदेशांतील व प्रादेशिक भाषांतील काही गाजलेल्या चित्रपटांची प्रातिनिधिक निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल असून, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.‘आयाम महिला पत्रकार’ पुरस्कारशुक्रवारी (दि. ९) दुपारी ४.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महिला पत्रकारांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी दर वर्षी महोत्सवात ‘आयाम महिला पत्रकार’ पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी देशविदेशांत भ्रमंती करून अनुभवावर प्रवासी ब्लॉग लिहिणाºया रितू हरीश गोयल या महिला पत्रकाराची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यातच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. उद्घाटनानंतर सिडने पोलॅकदिग्दर्शित ‘आऊट आॅफ आफ्रिका’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. प्रख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप हिची यात प्रमुख भूमिका आहे.रविवारी (दि. ११ मार्च) सकाळी १० वाजता इमेन्यूल बरकॉटदिग्दर्शित ‘आॅन माय वे’ हा फ्रेंच चित्रपट, दुपारी १२ वाजता जीन मार्क व्हॅलीदिग्दर्शित ‘वाईल्ड’ हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री रिव्ह विदर स्पून हिला अॅकॅडमी पुरस्कार मिळाला आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजता टायफूर आयदीनदिग्दर्शित ‘ब्लॅक क्रो’ हा तुर्कीश भाषेतील चित्रपट दाखविला जाणार आहे. ‘इट प्रे लव्ह’ या रॅन मर्फी यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. त्यापूर्वी केसरी टूर्सच्या झेलम चौबळ, गिरीकंदच्या शुभदा जोशी, डॉ. अमिता कुलकर्णी, वासंती घैसास आपल्या प्रवासी अनुभवावर संवाद साधतील.
महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:03 AM