राजगुरुनगर: महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या बचतगटाच्या महिलांनी राजगुरुनगर येथील खेड पोलीस स्टेशन, खेड पंचायत समिती, खेड तहसीलदार आणि प्रांत व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून अधिका-यांना निवेदन दिले.स्वयंसिद्ध महिला संघ बचत गटाच्या तालुक्यातील दोनशेपेक्षा जास्त महिलानी सोमवारी (दि. २७) खेड पोलीस स्टेशन, खेड पंचायत समिती, खेड तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर जनजागृती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ग्रामीण महिला स्वयंसिद्ध बचतगटाच्या व चैतन्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुधा कोठारी यांच्या मार्गदशर्नाखाली आस्थापना विभागाच्या प्रमुख सुरेखा क्षोत्रीय, सामाजिक विभागाचे प्रमुख संजय जोशी यांनी केले. यावेळी मंगला काळे, अर्जुन कुंभार, जया बैरागी, कविता बोंबले, सीता जाधव, शारदा कारेगावकर यांच्यासह दोनशेपेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी चैतन्य संस्थेच्या विश्वस्त सुरेखा क्षोत्रीय म्हणाल्या की ' शहराबरोबर आता ग्रामीण भागातील लहानमुली तरुणी आणि महिला कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडत आहेत. अन्याय अत्याचार करणारे नराधम खुलेआम फिरत आहेत. त्यांच्याकडून पिडीत महिलांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार त्या निमुटपणे सहन करत आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून या महिलांची वेळीच दखल घेतली जात नाही. पिडीत महिलानाचांगले समुपदेशन मिळत नाही. या प्रश्नांविषयी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे क्षोत्रीय यांनी सांगितले. (वार्ताहर)४महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिला, मुली, बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ४महिलांपर्यंत कायद्याची माहिती पोहचविण्यात यावी, पिडीत महिलांना आधार मिळावा आदि मागन्यांचे निवेदन खेड पोलीस स्टेशन, प्रांतअधिकारी, तहसीलदार कार्यालय, खेड पंचायत समिती आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयाला देण्यात आले.
महिलांचा जनजागृती मोर्चा
By admin | Published: April 27, 2015 11:47 PM