पुणे : महिला सर्वच क्षेत्रांमध्ये करिअर करीत आहेत. त्यांची उच्च शिक्षण व प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. हा देशाच्या दृष्टीने एक प्रकारे शुभसंदेश आहे. देशातील हा बदल शिक्षण कार्यप्रणालीत झाला पाहिजे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. स्नेहल प्रकाशित व बृहन् महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स (बीएमसीसी)चे माजी प्राचार्य डॉ. चिंतामणी गणेश वैद्य लिखित ‘मी - प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, अरुण निम्हण, स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या ५० वर्षांच्या शिक्षणक्षेत्रातील अनुभवांवर आधारित हा ग्रंथ आहे. नाईक म्हणाले, ‘‘शिक्षणक्षेत्रातील हा बदल सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तसेच, उत्तर प्रदेश शिक्षणात मागासलेले राज्य आहे, असे वारंवार सांगितले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये तिथल्या शिक्षणक्षेत्रात एक चांगला आणि सकारात्मक बदल जाणवतोय. सर्व विद्यापीठांमध्ये ४५ टक्के विद्यार्थिनी व ५५ टक्के विद्यार्थी आहेत. ज्या मुली महाविद्यालयाच्या पदवीला बसतात, त्यांपैकी ६० ते ६५ टक्के विशेष प्रावीण्य मिळवितात.’’ डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘लोकांच्या मोठेपणामुळे मी मोठा झालो नाही, ही वैद्यांची प्रवृत्ती नाही. शिक्षणक्षेत्रात जीवनाला अर्थ देण्याकरिता प्राचार्य वैद्यांनी प्रयत्न केले. हे आत्मचरित्र नाही, अनुभव लिहिले आहेत. आठवणीचे आदर्श पुस्तक कसे असावे त्याचा हे पुस्तक उत्तम नमुना आहे.’’रवी घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. प्रकाश भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय कंदलगावकर यांनी आभार मानले.
महिलांची वाटचाल देशासाठी शुभसंदेश : राम नाईक : मी-प्राचार्य सी. जी. वैद्य ग्रंथ प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:14 PM
देशातील हा बदल शिक्षण कार्यप्रणालीत झाला पाहिजे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. स्नेहल प्रकाशित बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉ. चिंतामणी गणेश वैद्य लिखित ‘मी-प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देराम नाईक यांच्या हस्ते ‘मी - प्राचार्य सी. जी. वैद्य’ पुस्तकाचे प्रकाशन हे आत्मचरित्र नाही, अनुभव : डॉ. गो. बं. देगलूरकर