पुणे : गणरायाच्या विसर्जनासाठी मिरवणुकीमध्ये यंदा महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाला. ढोलताशा पथक, ध्वज पथक, लेझिम पथकामध्ये महिलांनी आपली सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. साडी घालून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीसमोर लेझीम खेळणाऱ्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दहा दिवसानंतर गणरायाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ढोल ताशाच्या तालावर पुणेकर थिरकत होते. नूमवी मुलींच्या ध्वजपथकाने गुरूजी तालीम गणरायासमोर आपली सेवा सादर केली. त्यांनी शिस्तबद्ध असा ध्वज सादरीकरण केले.
मानाचा पाचवा केसरीवाडा या गणरायासमोर महिलांच्या लेझीम पथकाने अनोख्या पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. साडी घातलेली, नाकावर नथीचा तोरा आणि पदर कमरेला खोचलेला. अशा प्रकारे नटून थटून महिलांनी लेझिमच्या तालावर सर्वांना थिरकायला लावले.
झांज पथकामध्येही महिला अधिक प्रमाणावर पहायला मिळाल्या. एकूणच यंदा विसर्जन मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय पहायला मिळत आहे. तसेच ही मिरवणूक पहायला देखील महिला, मुली मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसून आले.