पुणे : शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी होणारी महिला आणि मुलींची छेडछाड तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांना दुचाकी देण्यात येणार आहेत. या दुचाकींवरुन प्रत्येकी दोन महिला कर्मचारी शहरात विविध ठिकाणी गस्त घालणार आहेत. यापुढे महिला कर्मचाऱ्यांची गस्तही प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले.पाठक आणि सह आयुक्त सुनील रामानंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलीच गुन्हेविषयक बैठक बोलावली होती. सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सोनसाखळी चोरीचे गुन्हे कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये २४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याठिकाणी चार तास वाहन तपासणी सुरू राहणार आहे. प्रत्येक विभागांच्या उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी चोरी होणारी सहा ठिकाणे निश्चित करून तेथे सकाळ - संध्याकाळ चार तास नाकाबंदी आणि गस्त घालावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासाठी प्रत्येक परिमंडलामध्ये प्रत्येकी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनाही गस्तीसाठी अधिकची १३ वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ११ उपायुक्त आणि २३ सहायक आयुक्तांसह ३८ पोलीस ठाणी आहेत. यातील १२ पोलीस ठाण्यांना ३ चारचाकी वाहने आहेत. त्यांना चौथे वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाकाबंदी करताना नेमके कोणाला अडवायचे, कोणाच्या वाहनाची तपासणी करायची, याबाबतही पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या.
छेडछाड रोखणार महिला पोलिसांचे ‘दुचाकी स्क्वॉड’
By admin | Published: April 25, 2015 5:18 AM