पुणे : दाेन दिवसापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले असून अापल्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे त्यांनी म्हंटले अाहे. सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेल त्याचबराेबर माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या शाळा, कॉलेज या संस्थांच्या विकासामध्ये योगदान केले पाहिजे. हा अापल्या म्हणण्याचा मूळ आशय आहे. तसेच भाषणात वापरलेला ‘भिकेचा कटोरा’ हा शब्द चुकीचा असून, तो मी मागे घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले अाहे.
शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे वादग्रस्त वक्तव्य जावडेकरांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका हाेत अाहे. त्यामुळे जावडेकरांनी आता अापल्या वक्तव्याचा खुलासा केला अाहे. दोन दिवसापूर्वी पुणे येथे झालेल्या शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये मी केलेल्या भाषणातून एक गैरसमज झालेला माझ्या लक्षात आला आणि म्हणून मी हा स्पष्ट खुलासा करू ईच्छितो, की माझ्या म्हणण्याचा असा मुळीच अर्थ नाही की सरकार शिक्षणावर खर्च करणार नाही आणि माजी विद्यार्थ्यांनीच खर्च करावा. माझ्या म्हणण्याचा आशय सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेल जसे गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने ७० टक्के शिक्षणावरील तरतूद वाढविली आहे. त्यामुळे अशी आम्ही वाढवतच राहू. परंतु त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या शाळा, कॉलेज या संस्थांच्या विकासामध्ये योगदान केले पाहिजे. हा माझ्या म्हणण्याचा मूळ आशय आहे.
माझे भाषण पूर्ण पाहिल्यावर हे लक्षात येईल आणि म्हणून हा गैरसमज झाला असेल तर या खुलाशाने दूर होईल अशी मला खात्री आहे. कारण शिक्षणासाठी मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतच राहू. ज्ञानप्रबोधिनी शाळा चालविण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मदत करतात ही चांगली घटना आहे. याचे उदाहरण देऊन मी हे सांगितले होते. या भाषणात वापरलेला ‘भिकेचा कटोरा’ हा शब्द चुकीचा असून, तो मी मागे घेत आहे. असा खुलासा जावडेकरांनी केला अाहे.