दीपक जाधव
पुणे, दि. 20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात शिकणा-या अंकुश आरेकर या विद्यार्थ्याच्या ‘बोचलं म्हणून’ या कवितेच्या व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. सद्यपरिस्थितीचा नेमक्या शब्दांमध्ये वेध घेत, त्यावर बोच-या शब्दात ताशेरे ओढत, राजकीय नेत्यांना जाब विचारणा-या शेतकरी पोराच्या या एका छोटया कवितेने अनेकांना घाम फोडला आहे. त्याच्या या व्हिडीओला युटयूब, फेसबुक, व्टिटर, वाटस्आपवर लाखो हिट अन् लाइक्स मिळत असून अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
साहित्यामध्ये व्यवस्थेला हादरवून टाकण्याचे सामर्थ्य असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अंकुशच्या ‘बोचलं म्हणून’ या कवितेला सोशल मिडीयावर मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्याची छोटीशी झलक पुन्हा पहायला मिळत आहे. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी पिंपरी-चिंचवड येथील अंकुशराव लांडगे सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातून निवडलेल्या ७ कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अंकुश आरेकर याची त्यासाठी निवड झाली होती. त्यावेळी त्याने सादर केलेली ‘बोचलं म्हणून’ ही कविता सध्या जोरदार हिट झाली आहे.
अंकुश हा मुळचा सोलापूर जिल्हयातील मोहोळ तालुक्यातल्या भांबेवाडी गावचा आहे. शाळेत असल्यापासून त्याला कविता लिहण्याची आवड आहे. आतापर्यंत त्याने ३० ते ४० कविता लिहलेल्या आहेत. राज्यभरात अनेक कार्यक्रमांमध्ये त्याने त्याच्या कवितांचे वाचन केले आहे. गेल्या एक वर्षापासून तो सद्यपरिस्थिचा वेध घेणारी ‘बोचलं म्हणून’ ही कविता लिहीत होता. या कवितेमध्ये अनेकवेळा त्याने बदल केले. अंकुशराव लांडगे सभागृहात ही कविता सादर करताना त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तिथे आयोजकांनी लावलेल्या एका छोटया कॅमे-यामध्ये त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. हा व्हिडीओ कुणीतरी सोशल मिडीयावर टाकला, त्यानंतर तो सगळीकडे व्हाइरल झाला. आपल्या कवितेचा व्हिडीओ सगळीकडे खूप फिरत असल्याचे त्याला त्याच्या मित्रांकडून समजले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंकुशला त्याची कविता आवडल्याचे असंख्य फोन येण्यास सुरूवात झाली आहे. आपल्या कवितेला मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे तो भारावून गेला आहे.
आतून मांडायचे होते, ते कवितेतून व्यक्त झालो
‘‘मला जे आतून काहीतरी मांडायचे होते, ते कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालो आहे. माझी ही कविता आवडल्याच्या हजारो कमेंट येत आहेत, त्याचबरोबर त्यावर टिका करणाºया पोस्टही पडत आहेत. या सर्व प्रतिसादाचे स्वागतच आहे. कवितेवर विरोधी मत व्यक्त करण्यासही हरकत नाही मात्र सहिष्णू पध्दतीने ते व्हावे. ज्याच्या त्याच्या परीने त्यांनी कविता समजावून घ्यावी.’’-अंकुश आरेकर, कवी