भोर: भाेर-महाड रस्त्यावरील आपटी-शिरगावपर्यंतच्या रस्त्याचे काम ठेकेदाराच्या गलथानपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरील झालेले डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाली आहे. तर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
भोर-महाड रस्त्यावरील आपटी-शिरगाव या रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी सुमारे ९ कोटी ७५ लाख निधी मंजूर केला होता. त्यानंतर ठेकेदारानंतर या कामातील आपटी ते वारवंडपर्यंत डांबरीकरणाचे काम केलेले आहे. मात्र त्यावर मागील वर्षभरात कारपेटचे काम केले नाही. गटारे काढली नाहीत. त्यामुळे डांबरीकरण उखडायला लागले आहे. यावर कारपेट टाकले नाही तर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतील. याशिवाय वारवंडच्या पुढे शिरगावच्या अलीकडे तीन चार किलोमीटर डांबरीकरण केलेले नाही. यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. शिरगाव ते वाघजाई मंदिरापर्यंतचे काहीच काम झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पुढील चार महिन्यांत रस्त्याचे काम झाले नाही तर संपूर्ण रस्ताच उखडणार आहे. सध्या काम बंद असून सदरचे काम सुरु झाले नाही तर सुमारे १० कोटी रु पाण्यात जाण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला काम सुरु करायला सांगावे, अन्यथा दंडात्मक कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, भोर-महाड रस्त्यावरील आंबेघर ते आपटी येथील मोऱ्या करणे, डांबरीकरण, कारपेट करणे हे कामही एका ठेकेदाराने घेतले आहे. माञ हेही काम अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. याचाही त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
मागील तीन महिने भोर महाड रस्त्यावरील आपटी ते शिरगाव रस्त्याचे बंद असलेले काम सुरु करण्याबाबत पत्र दिले असून संबंधित ठेकेदाराकडून लवकरच काम सुरु करण्यात येईल
शिवानंद हल्लाळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर