केडगाव : गेल्या तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही अष्टविनायक मार्गावरील पारगाव ते दौंड येथील रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडेना. या रस्त्यावर नांनगाव गाव येत असल्याने येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे.
आमदार राहुल कुल यांच्यामुळे अष्टविनायक महामार्गाच्या ८५० कोटी पैकी २५० कोटी निधी एकट्या दौंड तालुक्याला मिळाला आहे. कुल यांच्या प्रयत्नातून अष्टविनायक मार्गातून हा रस्ता मंजूर झाला आहे. ठेकेदाराचा नाकर्तेपणा व ग्रामस्थांची बेजबाबदार वृत्तीमुळे रस्ता अपूर्णावस्थेत आहे. सहा महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी मोठ्या शिताफीने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली, परंतु पारगाव नांनगाव परिसरातील काही ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम वेगवेगळी कारणे शोधत बंद पाडले. तेव्हापासून काम बंद आहे. ठेकेदाराने या रस्त्याचे रुंदीकरण केले असून त्यावर मुरूम पसरला आहे. धुरळा उधळू नये म्हणून दररोज टँकरने पाणी मारण्याचे काम चालू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. हा रस्ता पारगाव, नानगाव, हातवळण, कानगाव, गार, नानविज सोनवडी मार्गे दौंडला जाणार आहे. अष्टविनायक महामार्गावरील सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या रस्त्यामुळे जोडले जाणार आहेत. पारगाव व नानगाव ग्रामस्थांना दौंडला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता प्राप्त होणार आहे. पारगाववरून ३० किलोमीटर अंतरावर दौंड असल्याने वेळ आणि पैसा यांची बचत होणार आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
आमदार राहुल कुल यांनी या रस्त्यासाठी वीस कोटी निधी संबंधित ठेकेदाराकडे वर्ग केला. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नानगाव ग्रामपंचायतीने या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नगरारे यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला लवकरच काम सुरू केले जाईल असे आश्वासन दिले. पावसाळा तोंडावर आल्याने आम्हाला या रस्त्याची नितांत गरज आहे. तसेच संबंधित रस्ता अष्टविनायक महामार्गाकडे वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने आमची गैरसोय झाली आहे. असे नानगावचे उपसरपंच संदीप खळदकर-पाटील यांनी सांगितले.
रस्त्याचे काम चालू आहे. नुकतेच अष्टविनायक महामार्गपैकी पाटस दौंडचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा दौंड ते सिद्धटेक चालू आहे. हे काम संपल्यानंतर भविष्यामध्ये पारगाव ते दौंड हे काम हाती घेण्यात येणार आहे.
एस. डी. नगरारे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
०५ केडगाव नांनगाव
नानगाव येथे अष्टविनायक महामार्गाचे अर्धवट अवस्थेतील काम.