जुन्नर : शहराचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित करणाऱ्या निजामशाहीच्या कालखंडातील वेशीचे दुरुस्तीचे नगर पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात पाऊणशे नागरिकांनी सह्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे.
शहरातील बाजार पेठेतील परिसरात वाहणाऱ्या नाल्याच्या उंचवट्यावर निजामशाहीच्या कालखंडातील वेस आहे. पूर्वी या वेशीलगत तटबंदी होती. परंतु काळाच्या ओघात तिचे अस्तित्व विरून गेले आहे. वेशीच्या बुरूजावर असलेले उठावकृती शिल्प निजामशाहीच्या राजवटीचे बोधचिन्ह दर्शविते. वेशीच्या भिंतीची दुरुस्ती मात्र पेशवाईच्या काळात झाल्याचे पुस्तकी विटांचे बांधकामावरून अनुमान बांधता येतो. नंतर मात्र वेशीची घडीव दगडातील कमान काढण्यात आली होती व नगरपालिकेने यावर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब टाकला होता. नगर पालिकेकडून वेशीचे सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची
तक्रार नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात पाऊणशे नागरिकांनी सह्यांचे निवेदन नगरपालिका प्रशासनाकडे दिले आहे. हे निकृष्ट दर्जाचे काम तातडीने थांबवावे, अशी
मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत असलेल्या स्लॅबला चिरा गेलेल्या आहेत. सदर स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेशीच्या बुरूजाच्या मूळ साचालाही तडे गेलेले आहेत, त्यामुळे दुर्घटना घडू शकते. वेशीची नव्याने दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम करण्यापूर्वी त्याचा पाया आणि बाजूची भिंत यांचे दगड सुटे झालेले आहेत. याची पाहणी करूनच दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे. या संदर्भात अनेकदा निवेदने दिलेली आहेत. याची
प्रशासनाने दखल घेऊन हे काम नव्याने करण्यासाठी तरतूद करावी. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार पालिका प्रशासन राहील, असा इशारा श्रीकांत जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, वेशीचे मजबूतीकरण, सुशोभीकरण पुरातत्त्व शैलीच्या बांधकामास अनुसरुन करण्यात येणार आहे. कामाचा दर्जा योग्यच आहे.
नागरिकांच्या मागणीची दखल घेतली जाईल, असे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
२५ जुन्नर
२५ जुन्नर १
वेशीच्या स्लॅबला व बांधकामाला गेलेले तडे.