राजुरी : बोरी - साळवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील पुलाच्या पायाचे व संरक्षण भिंतीचे काम रखडले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पुर आला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे बोरी बुद्रूक व साळवाडी (ता.जुन्नर)येथील कुकडी नदीवरील असणा-या पुलाचा पाया खचून पुलाचा काही भाग कोसळलाहोता. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला होता.
या पुलाच्या दुरूस्तीसाठी एक कोटी पंचाहत्तर लाख रूपयांचा निधी मंजुर झाला होता. त्यानंतर पुलाची दुरूस्ती करून पुल जानेवारी महिन्यामधे वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यानच्या काळात पुलाच्या संरक्षण भिंतीचे व पायाच्या दुरूस्तीचे काम सुरूच होते. हे काम सुरू असतानाच येडगाव धरणातून कुकडी नदीत पाणी सोडण्यात आलेले होते. त्यामुळे दुरूस्तीचे काम रखडले होते. परंतु त्यानंतर येडगाव धरणातून धरणातुण पाणी सोडण्याचे बंद केलेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने भरावाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने काम रखडले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. या नदीला मोठा पुर आल्यास भराव खचला असल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुल कोसळण्याचा धोका आहे. मागील वर्षी स्थानिक ग्रामस्थांनी या बाबत अशीच वेळोवेळी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाचा पाया खचून संरक्षण भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने पुलाचा काही भाग कोसळला होता. या बाबत लोकमतने वारंवार वृत्त दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्तता आहे. मोठी दुर्घटना होण्या आधी पूल दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.