लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक वर्षे शेतकरी संकटात होता आणि आता कोरोना, शेतकरी आंदोलन यामुळे आपला शेतकरी अवघड काळातून जात आहे. या संकटामुळे शेतकरी भरडला जात आहे. त्याचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. शेतकरी आंदोलनामुळे तांदूळ महोत्सवात जो तांदूळ पोहोचला नाही, तो लवकरात लवकर पोहोचला तर शेतकऱ्यांसोबत आपल्याला देखील आनंद होणार आहे. यासाठी ग्राहक पेठ सेतूचे काम करत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित २८ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अॅन्ड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणीम, उदय जोशी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणीपर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पाहायला मिळत आहेत.
राजेश शहा म्हणाले, मागील २८ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे.
फोटो ओळ : ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे २८ व्या ग्राहक पेठ तांदूळ महोत्सावाचे आयोजन केले आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी उपस्थित सूर्यकांत पाठक, राजेश शहा आदी.
(फोटो - ग्राहक पेठ नावाने हॅलोसिटीमध्ये आहे.)
बातमी फोटोसह मस्ट आहे.