धायरी : अतिवृष्टी झाल्यामुळे प्रयेजा सिटी-सनसिटी रस्त्याला जोडणारा पूल व रस्ता वाहून गेला होता. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची नुकतीच पाहणी केली.
राष्ट्रीय महामार्गावरून वडगाव, धायरी, नांदेड व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच वाहतुकीचा ताण हा सनसिटी रस्ता व पर्यायाने सिंहगड रस्त्यावर येत आहे. या पुलाच्या कामाचा आढावा नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी घेतला. प्रयेजा सिटी ते सनसिटीला जोडणाऱ्या या पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेल्याने महामार्गापासून धायरी, खडकवासल्याकडे जाणारी होणारी वाहतूक अडचणीत होती. त्यानुषंगाने या पुलाचे तातडीने काम पूर्ण करण्याचे नियोजन असून पुलासाठी २ कोटी १७ लाख खर्च अपेक्षित असून येत्या मे महिन्यात हे सर्व काम पूर्ण होईल व पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे नगरसेवक जगताप यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ अभियंता अमजत मुलाणी, कनिष्ठ अभियंता केदार देशपांडे उपस्थित होते.