पुणे : महापालिकेतील अनेक कामे ठेकेदारामार्फत केली जातात. या ठेकेदारांच्या कामगाराकडे त्यांच्या एजन्सीचे किंवा कंपनीचे ओळखपत्र असणे अपेक्षित आहे; मात्र महापालिकेचा लोगो आणि नावाचा वापर करून अनधिकृत ओळखपत्र तयार करून ते वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या सुरक्षा विभागाने आतापर्यंत १७५ अनधिकृत ओळखपत्र जप्त केली आहेत.
पुणे महापालिकेच्या लोगोचा आणि नावाचा वापर करून अनधिकृत ओळखपत्र तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या सुरक्षा विभागाने ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे १७५ अनधिकृत ओळखपत्रधारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने या लोकांना तंबी देऊन सोडले आहे.
महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र, यातील काही लोक महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाने पालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरू केली आहे. हे काम तृतीयपंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखविल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेचे अनधिकृत ओळखपत्र मिळाले आहे. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्मार्ट कार्ड देण्यात आली आहेत. त्यावर सेवक कोड नंबर आणि आधार कोड आहे. मात्र, अनधिकृत ओळखपत्रांवर असे काही आढळून आले नाही. त्यामुळे १७५ अनधिकृत ओळखपत्र जप्त केली आहेत असे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्वच्छता, डाटा एन्ट्री यासह विविध कामांसाठी ठेकेदार किंवा कंपनीचे लोक येतात. या लोकांकडे महापालिकेचे ओळखपत्र सापडले आहेत. ही ओळखपत्रे जप्त केली आहेत. या लोकांना महापालिकेचे ओळखपत्र न वापरता तुमच्या कंपनीचे किंवा ठेकेदाराचे ओळखपत्र वापरा, अशी ताकीद देण्यात आली आहे.
- सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग