लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठा समाजातील गरजू, अंध, अपंग, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचा कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आगामी काळात ५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न असेल, असे संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी सोमवारी येथे सांगितले.राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेली विश्वांजली गायकवाड, भिक्षेकऱ्यांसाठी फिरता दवाखाना चालविणारे डॉ. अभिजित सोनावणे, आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र कबड्डी लीग सुरू करणारे राजेंद्र देशमुख यांना शिंदेशाही पगडी, मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी पासलकर बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विठ्ठल जाधव यांच्यासह कैलास वडघुले, प्राची दुधाने, यशवंत गोसावी आदी उपस्थित होते.पासलकर म्हणाले, ‘‘गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम गेली ३ वर्षे राबविला जात आहे. आजपर्यंत आम्ही ५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी तळागाळातील विद्याथर््यांच्या जीवनात फुल ना फुलाची पाकळी पोहोचवू शकतो. दानशुरांनी या उपक्रमात मदत केल्यास समाजासाठी ती कृतिशील मदत होईल.’’ प्रशांत धुमाळ सूत्रसंचालन यांनी केले. अनिल माने यांनी आभार मानले.
शाहूराजांच्या विचारांचा कृतिशील कार्यक्रम हाती
By admin | Published: June 27, 2017 7:55 AM