पुणे : व्यक्तीमधील मूलभूत बाबी काढून निर्जीव सांगाडे तयार करण्याचे तंत्र आज वापरले जात आहे. दहशतीचा वापर करून शारीरिक हत्या न करताही व्यक्तींना संपवले जात आहे. सामाजिक एकात्मतेचे विचार, बहुसमावेशक रचनेला आव्हान देणारे विषारी बाण रोखण्यासाठी अभेद्य भिंत उभी करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्कल यांच्या वतीने ‘सामाजिक एकात्मता’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनजंय लोखंडे, डॉ. सतीश शिरसाट आदी उपस्थित होते.तोडा फोडा नितीतून दहशत निर्माण केली जात आहे. त्यातून भंपक माणसांच्या बेगडी प्रतिमांचा उत्सवी प्रचार करण्यात आला. सनदी अधिकारी आणि व्यवस्थापकीय कारभाºयांना हाताशी घेऊन सामाजिक, नागरी मुद्यांवर नवी धोरणे, कायदे बनवले जाऊ लागले आहे. वरकरणी त्याचे स्वरुप अराजकीय असते, परंतु त्यांची प्रेरणा मात्र राजकीय असते, असे पालेकर म्हणाले.
शारीरिक हत्येविना व्यक्तींना संपवण्याचे काम सुरू - पालेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 5:11 AM