पुणे: नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज संस्थेच्या माध्यमातून राहुल आणि देवता देशमुख नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संगणक शिक्षणाच्या मदतीने सक्षम बनवण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन वाटा मिळत आहेत. त्यांचे हे कार्य सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मत साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने गरजू व गुणवान विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे चालू राहण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सबनीस यांच्या हस्ते नेत्रहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच संस्थेतून शिकून बाहेर पडलेल्या ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, कवयित्री ललिता सबनीस आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले की, राहुल व देवताचा हा व्यापक व आगळावेगळा संसार पाहून येथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचे हृदय द्रवल्याशिवाय राहत नाही. या संस्थेत आल्यावर माणुसकीचे उदाहरण पाहायला मिळते.
.........................
संस्थेतील नेत्रहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांकडे कौशल्य, क्षमता आणि कला आहे. त्यांनी राहुल देशमुख यांच्यासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात उत्तुंग स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग