शहराच्या विकासासाठी राजकारण न करता काम करा, अजित पवारांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:27 PM2023-01-06T23:27:58+5:302023-01-06T23:28:38+5:30
Ajit Pawar: राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार हे महापुरुषांबाबत तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासासाठी राजकारण न करता दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे
पुणे : राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार हे महापुरुषांबाबत तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासासाठी राजकारण न करता दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे. राज्यात आमची सत्ता असताना पुण्यात आयटी हब तयार करून लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र, आपले प्रकल्प परराज्यांत जात आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुभाष जगताप, उषा जगताप, संतोष नागरे, सुशांत ढमढेरे, गौरव घुले, दिलीप अरूंदेकर, श्वेता होनराव, नीलेश वाघमारे, श्रीनिवास जगताप आदी उपस्थित होते.
नागरी सेवा महत्त्वाचे केंद्र असून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले पाहिजे, असे सांगून अजित पवार म्हणाले, शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तेथे गुण्या गोविंदाने राहण्याची संस्कृती होती. मात्र, राज्यातील सध्याचे सरकार भेदभाव करून तेढ निर्माण करत आहे.
यावेळी सुभाष जगताप म्हणाले, सहकारनगर भागाचा विकास केला खड्डे विहिरीत रस्ते, तळजाऊ टेकडीवर दहा हजार देशी झाडे लावली आहेत. शहरात राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक विधायक कामे केली आहेत.
पालकमंत्र्यांवर टीका
क्रांतिसुर्य महात्मा फुले त्या काळात सक्षम होते आणि आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की भीक मागत होते. हे म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.