पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची निविदा आणि निधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर देण्यात आली. यामुळे आता लवकरच येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु होणार आहे. पुणे-सोलापुर आणि पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर घोरपडी येथे असलेल्या रेल्वे गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. याशिवाय घोरपडी गावातील रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने वाहतुक कोंडीत भरच पडते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी याठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन केले आहे. हा उड्डाणपुल पुणे-सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गावर करण्यात येणार आहे. उड्डाणपुलासाठी सन २०१९ च्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे पूर्वगणक पत्रक ५० कोटी रुपयांचे आहे. या उड्डाणपुलाचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. पुणे - सोलापूर रेल्वे मार्गावर उड्डाणपुल बांधण्याचे काम मे. मनोजा स्थापत्य या ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्याच्या प्रस्तावासह ३९ कोटी खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिल्याचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले आहे.
घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे काम लवकरच सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 6:13 PM
पुणे-सोलापुर आणि पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर घोरपडी येथे असलेल्या रेल्वे गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते..
ठळक मुद्दे१९ कोटी ६० लाखांची तरतूद