पुणे : पुण्यातल्या कामांसाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची दिल्लीत गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे पडघम वाजू लागल्याचे बोलले जात आहे. ‘तुमचे काम मीच केले’ अशी श्रेय घेण्याची स्पर्धा त्यातून सुरू झाली असून, त्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या चर्चेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंग चढू लागला आहे. कामे मात्र जशी होती तशीच आहेत.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे अशा भाजपाच्या तीन प्रमुख लोकप्रतिनिधींनी एकाच कामासाठी दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या दिवशी भेट घेतली. त्याचे निवेदनही तिघांनी वेगवेगळे काढले, काम मात्र तसेच राहिले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे कॅन्टोन्मेंट अशी दोन वसाहतींच्या नळपाणी, वीजजोडणी, जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अशा बºयाच समस्या आहेत. त्या अनेक वर्षांपासून आहेत. संरक्षण खात्याच्या धोरणामुळे तिथे उंच इमारती बांधता येत नाहीत. गेली अनेक वर्षे हा विषय रेंगाळत पडला आहे. त्याकडे कोणीही पाहत नव्हते. आता मात्र या समस्यांसाठी सत्ताधारी भाजपामधील सगळेच पदाधिकारी सरसावले आहेत. सुरुवातीला खासदार अनिल शिरोळे यांनी याबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला. त्यांनी सकारात्मकता दर्शवली असे शिरोळे यांचे म्हणणे आहे. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट दिल्लीत जाऊन धडकले. त्यांनीही तिथे सीतारामन यांची भेट घेतली. त्या वेळी खासदार शिरोळे हेही त्यांच्यासमवेत होते अशी माहिती मिळाली. बापट यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तिथे पुण्याच्या प्रश्नांसंबधी सीतारामन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केले. त्याशिवाय पुण्यात आल्यानंतर निवेदन प्रसिद्धीला दिले.
या निवेदनात खासदार शिरोळे यांचे नावच नव्हते. त्यामुळे त्यांनी अधिवेशनासाठी दिल्लीत गेल्यानंतर पुन्हा सीतारामन यांची भेट घेतली. त्यांनीही खडकी व पुणे कॅन्टोन्मेंटचे प्रश्न मांडले. त्यांनीही एक निवेदन प्रसिद्धीला देऊन त्यात सीतारामन यांनी कामाला गती देण्यात येईल असे सांगितले असल्याचे स्पष्ट केले. या दोन्ही पदाधिकाºयांची ही धडपड पाहून भाजपाचेच सहयोगी खासदार असलेले संजय काकडे यांनी आणखी दोन पावले पुढे टाकली. अधिवेशनासाठी दिल्लीला जाताना त्यांनी या दोन्ही कॅन्टोन्मेंटमधील काही पदाधिकारी बरोबर नेले. त्यांची अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर बैठक घडवून आणली. प्रश्न तेच खडकी व पुणे कॅन्टोन्मेंटचे. विकासकामांसाठी निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केले. जीएसटीबाबतचे काही प्रश्न होते ते मांडले.लोकसभेच्या येत्या निवडणुकीसाठी हे तिघेही भाजपाकडून इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यातील शिरोळे हे विद्यमान खासदार आहेत, तरीही थेट पालकमंत्री असलेल्या बापट यांच्याशी स्पर्धा करावी लागणार असल्याने ते चिंतित झाले आहेत. त्यातच बापट यांनी निवेदनात त्यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे ते अधिकच धास्तावले व त्यांनीही संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, त्यांनी देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंटसाठी स्थापन केलेल्या केंद्रीय समितीसमोरही प्रश्न मांडले.संजय काकडे यांनी तर उघडपणे भाजपाने आपल्यालाच उमदेवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी ते जोरदार फिल्डिंग लावत आहेत. दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या कॅन्टोन्मेंटचे प्रश्न मांडण्याचा उमाळा त्यांना त्यातूनच आला आहे.संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले म्हणजे प्रश्न सुटले असाच या सगळ्या इच्छुकांचा ग्रह झाला आहे. त्यामुळेच निवेदनात आता हा प्रश्न सुटला असे सांगत त्याचे श्रेय घेण्याची त्यांची धडपड सुरू आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपातील ही बड्या लोकप्रतिनिधींची धडपड शहरात चर्चेचा विषय झाली आहे.काँग्रेस इच्छुकांना पुण्याच्या पाण्याचे भरतेभाजपात अशी गर्दी उसळली असताना काँग्रेसच्या लोकसभा इच्छुकांना पुण्याच्या पाण्याचे भरते आले आहे. माजी आमदार मोहन जोशी यांनी भजनगायनाचे आंदोलन केले. आमदार अनंत गाडगीळ यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अॅड. अभय छाजेड यांनी प्रभात फेरी काढून महात्मा गांधीजींचे स्मरण केले. अरविंद शिंदे यांचे भाजपावर शरसंधान सुरूच असते.