पुणे : हस्तलिखित सातबारा व ऑनलाईन सातबारा यामध्ये जिल्ह्यात तब्बल 13 हजार 113 विसंगत सातबारे व विविध तक्रारी असलेले साडेचार हजार फेरफार दुरुस्त करण्यासाठी तातडीने सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या मार्च अखेर पर्यंत हे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी संबंधित सर्व यंत्रणेला दिले आहेत. यासाठी देशमुख स्वत: दररोज सायंकाळी सात वाजता ऑनलाईन बैठकीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारापासून थेट सर्कल, तलाठी यांचा आढावा घेणार आहेत. यामुळे जिल्हयातील हजारो शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.
राज्य शासनाच्या वतीने ऑनलाईन सातबारा ही मोहीम हाती घेऊन राज्यातील सर्व हस्तलिखित सातबारे ऑनलाईन केले. गेल्या अनेक वर्षापासून हे काम सुरू होते, सध्या शंभर टक्के सातबारे उतारे ऑनलाईन झाले असून, बहुतेक सर्व व्यवहारात ऑनलाईन सातबारा वापरला जात आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 14 लाख 98 हजार सातबारे ऑनलाईन करण्यात आले. हे हस्तलिखित सातबारे ऑनलाईन होताना अनेक चुका झाल्या आहेत. यात सातबा-यावरील क्षेत्र कमी जास्त होणे, सातबा-यावरील नावंच कमी होणे या सारख्या गंभीर चुकांन सोबत नावातील चुका असे अनेक प्रकार झाले आहेत.
या चुका लक्षात आल्यानंतर त्या तातडीन दुरुस्त करणे आवश्यक आहे. ही महसूल विभागाची जबाबदारी असताना सध्या सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना वारंवार तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. तर अनेक वेळा सातबारा, फेरफार दुरूस्तीसाठी मोठे आर्थिक व्यवहार देखील होतात. यामुळेच डाॅ.राजेश देशमुख यांनी आता विसंगत सातबार व फेरफार दुरुस्तीसाठी खास मोहिम हाती घेतली आहे.
यासाठी दररोज जिल्हाधिकारी स्वतःच सर्व प्रांतधिकारी, तहसीलदार आणि सर्वाधिक प्रलंबित सातबारा व फेरफार दुरुस्ती असलेल्या तलाठी व सर्कल यांची ऑनलाईन आढावा बैठक घेणार आहे. प्रत्येक तालुक्याने दररोज किती फेरफार, सातबारा दुरुस्त करायचे याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे मार्च अखेर पर्यंत हे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यात हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रलंबित विसंगत सातबारे व फेरफार दुरूस्ती तालुका विसंगत सातबारे फेरफार दुरुस्ती जुन्नर 154 391वेल्हा 40 48पुणे शहर 82 8आंबेगाव 318 235शिरूर 614 295भोर 623 437पुरंदर 888 342बारामती 835 146मावळ 833 457चिंचवड 803 - इंदापूर 1075 103दौंड 1019 263मुळशी 1257 284हवेली 3765 1252---------------------------------------------
एकूण 13113 4381प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे हेच उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेली लोकांची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण करणे हेच चांगल्या प्रशासनाचे लक्षण असून, जिल्ह्यात तलाठी कार्यालयापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोकांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागू नये हाच आपला प्रयत्न असतो. याचच एक भाग म्हणून आता जिल्ह्यात सर्व विसंगत सातबारा व तक्रारी असलेले फेरफार तातडीने दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या मार्च अखेर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी