हा रस्ता राज्यातील पहिलाच हायब्रीड एम्युनिटी प्रकल्पातील असून या रस्त्याचा वापर शिवगंगा खोऱ्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. त्याचबरोबर शिवकालीन कोंढणपूर येथील तुकाईमातेचे मंदिर तसेच सिंहगडसाठी येणाऱ्या नागरिकांना हा रस्ता सोईचा असल्याने या ठिकाणी रहदारी ही कायम असते. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कल्याण, मोरदरी, अवसरवाडी, शिवतारेवाडी, कोंढणपूर, राहटवडे, आर्वी, शिवापूर, श्रीरामनगर, रांजे या गावातील नागरिकांना व पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे काम नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाले होते. किमान दोन वर्षांत सदर रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे त्यावेळी काम करणाऱ्या रोडावेज सोल्युशन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र फेब्रुवारी २०२१ महिना संपायला आला तरीही काम अर्धवटच आहे हे विशेष!
याचबरोबर हा रस्ता तीन तालुक्यांना जोडला गेला असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर तसेच वेल्हा व भोर तालुक्यात जाण्यासाठी हवेलीच्या पश्चिम पट्ट्यातून जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने सदर रस्त्याला फार महत्व प्राप्त झाले आहे. एवढे असूनही या रस्त्याचे काम का बंद आहे. हा मोठा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सदर रस्ता हा मागील काळात कोरोनाच्या महामारीमुळे रखडला होता. सध्या डांबराची कमतरता भासत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत खड्डे बुजवून नंतर रस्त्याचे काम सुरू करणार आहे.
वैभव पाटील (व्यवस्थापक)
रोडवेज सोल्युशन (रस्त्याचे काम करणारी ठेकेदार कंपनी)
कोंढणपूर फाटा ते सिंहगड दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था.