धामणी येथील देवस्थान खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य भाविकांचे कुलदैवत आहे. कुलधर्म कुलाचारासाठी बाहेरगावचे भाविक दरवर्षी या देवस्थानाला येतात. गेल्या वर्षाच्या (२०२०) माघी पौर्णिमेच्या यात्रेत महाळुंगे पडवळ, गावडेवाडी, तळेगाव ढमढेरे व पंचक्रोशीतील गावातील भाविक व धामणी ग्रामस्थाची संयुक्त बैठक होऊन देवाला येणा-या भाविकांच्या सोईसाठी सभामंडप बांधण्याचा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आलेला होता. कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सभामंडपाच्या कामाची सुरुवात चंपाषष्ठीच्या दरम्यान करण्यात आली असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. भाविक व ग्रामस्थाच्या लोकवर्गणीतून बांधण्यात येत असलेल्या या सभामंडपाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दरवर्षी होणारी माघी पौर्णिमेची यात्रा (दि.२७ व २८ फेब्रुवारी) रद्द करण्यात आली असल्याचे गावक-यांनी सांगितले.
भाविकांनी व ग्रामस्थानी कोरोना संदर्भात शासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन धामणीच्या ग्रामस्थानी केले. कोरोनामुळे खंडोबा देवाचे दर्शन संपूर्णपणे बंद राहणार असल्याने बाहेरगावच्या भाविकांनी व ग्रामस्थांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.