पुणे : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सॅलिसबरी पार्कमध्ये उभारण्यात येत असलेले स्मारक रखडलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला असून गवत उगवलेले आहे. या स्मारकाच्या उभारणीकडे तीन वर्षांनंतरही होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे स्मारक अर्धवट अवस्थेत पडून आहे.शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन नगरसेविका वंदना भिमाले यांनी आयोजित केलेल्या एका कार्याक्रमादरम्यान २५ नोव्हेंबर २०११ रोजी आमदार विनोद तावडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरही उपस्थित होत्या. मात्र, अद्यापही या स्मारकाचे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते अमोल तुजारे यांनी उघडकीस आणली आहे. मागील सहा वर्षांपासून हे काम का रखडले आहे, याचा उलगडाच होत नसल्याने माहिती अधिकारामध्ये पालिकेकडे याची माहिती मागण्यात आली होती.पालिकेच्या रेकॉर्डवर स्मारकाची माहितीच उपलब्ध नसून स्मारकासाठी कोणीही परवानग्या मागितल्या नसल्याचे तसेच कोणताही उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला नसल्याचे उत्तर पालिकेने दिले होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी सध्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी अवघ्या १० दिवसांत स्मारकाचा चौथरा आणि त्यावरील प्रतिकृती तयार करून घेतल्याचा आरोप तुजारे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे फलकही सर्वत्र लावण्यात आले होते. मात्र, या स्मारकाचे लोकार्पणच झाले नाही. या ठिकाणी गेल्या सहा वर्षात एकदाही २६/११ ला श्रद्धांजली सभा घेण्यात आली नाही की एखादा दिवा लावलेला आला. स्मारकाभोवती राडारोडा पडलेला असून गवत वाढलेले आहे. तसेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी कम्युनिटी हॉल बांधण्यात येत आहे.
शहीद पोलिसांच्या स्मारकाचे काम रखडले, मोठ्या प्रमाणावर कचरा साठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:56 AM