पुणे : शिवाजीनगर येथील मूळ जागेवरच एसटी स्थानक करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महामेट्रोकडे प्लॅन दिला आहे. महामेट्रोकडून पीपीपी तत्त्वावर या ठिकाणी एसटी स्थानक बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी लवकरच महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यात करार होणार आहे. त्यानंतर एसटी स्थानकाचे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना प्रसारमाध्यमांना दिले.
शिवाजीनगर एसटी स्थानकासंदर्भात शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी भेट घेतली. सध्या वाकडेवाडी येथे सुरू असलेले एसटी स्थानकाचे स्थलांतर मूळ शिवाजीनगर येथील जागेवर व्हावे, अशी याबाबत पवार यांच्यासोबत शिरोळे यांनी चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. शिवाजीनगर एसटी स्थानकाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यास सांगितले. सरनाईक यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर एसटी स्थानक हलविण्याचे काम लवकर करण्याचे निर्देश महामेट्रोच्या प्रशासनाला पवार यांनी दिले. एसटी स्थानक स्थलांतर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि महामेट्रो (पुणे) यांच्यात करार अंतिम टप्प्यात असून, महामेट्रो हे काम पूर्ण करणार आहे. हा प्रकल्प लवकर व्हावा. यासाठी दोन्ही बाजू प्रयत्न करणार आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.