सण अंधारात साजरे करायचे का ?, अजित पवारांचा सरकारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:03 PM2018-10-12T17:03:51+5:302018-10-12T17:27:29+5:30
सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदच्या पुढे गेल्या, तर गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे.
रांजणगाव सांडस : राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारी संस्था अडचणीत असून या सरकारकडून सहकारी संस्था मोडी काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडवगण फराटा येथे केला. विजेचे भारनियमन सणासुदीच्या काळात सुरू केले असून, सण अंधारात साजरे करायचे का, असा सवालही त्यांनी केला. गांधी जयंती दिवशी सरकारने शेतक-यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे मारले. इतके असंवेदनशील हे सरकार असून संसारी माणसानेच सरकार चालवावे, फकिराला संसारी माणसांच्या वेदनांची जाणीव काय होणार, असा टोलाही पवार यांनी लगावला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या स्थलांतराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.पवार म्हणाले, जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अतिशय चांगली होती. परंतु, नोटाबंदीच्या काळानंतर जिल्हा बँकेचे पैसे अडवल्याने सभासदांचे मोठे नुकसान झाले. या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदच्या पुढे गेल्या, तर गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे. या सरकारला शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही.
वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये अडीच लाख जागा रिक्त आहेत. मात्र, सरकारने भरतीवर बंदी आणली आहे. नुसती मन की बात अन् चाय पे चर्चा करून चालणार नाही. तर, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायला हवेत तसेच या सरकारने दुष्काळ जाहीर करावा, असेही पवार यांनी सांगितले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, रावसाहेब दादा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुष्गुच्छ र्देन सत्कार केला. या प्रसंगी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी अध्यक्ष सुरेश घुले, प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारे, जि. प. सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर बाजार समिती संचालक विजेंद्र गद्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, शिरूर शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, जाकिरखान पठाण, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, उपसभापती जयमाला जकाते, मोनिका हरगुडे, घोडगंगा उपाध्यक्ष संतोष रणदिवे, नरेंद्र माने, बाबासाहेब फराटे, प्रशांत होळकर, प्रा. सुभाष कळसकर, दिलीप मोकाशी, उत्तम सोनवणे, मनीषा सोनवणे, अजित रणदिवे, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम, वडगावचे सरपंच निर्मला ढवळे हे उपस्थित होते.
..........