देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पाहणी दौरा करताना येलवाडी हद्दीत भेट न देता जिल्हाधिकारी सौरभ राव निघून गेल्याने संतप्त बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी रस्त्याचे काम थांबविले. जिल्हाधिकारी राव गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पाहणीसाठी आले होते. खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, अपर तहसीलदार किरणकुमार काकडे, हवेली मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी सचिन मोरे, शिरीष आचारी, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, सरपंच हेमा मोरे आदी उपस्थित होते.गाथा मंदिर परिसरातील घाट, गाथा मंदिराजवळून जाणारा रस्ता, वैकुंठस्थान समोरील भक्त निवास, खेड तालुक्याच्या सांगुर्डी हद्दीतील फेज २च्या रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ठेकेदारांना सूचना देत ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्या. संस्थानने वैकुंठस्थान मंदिरासमोरच भजनी मंडप बांधण्याची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.मुख्य मंदिरातील सत्कारानंतर सरपंच मोरे यांचे दीर रामभाऊ मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर विकास प्रकल्प सल्लागार योगेश राठी यांना असभ्य भाषा वापरत विकासकामांत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आणि चुकीची, निकृष्ट कामे करीत असल्याचा आरोप केला. गाथा मंदिर रस्त्याला जोडणारा खेड तालुक्याच्या येलवाडी हद्दीतील रस्त्याची पाहणी करण्यासाठी तीन तास प्रतीक्षा करूनही जिल्हाधिकारी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पुढे आपल्या समस्या मांडू पाहणारे बाधित शेतकरी, ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. सरपंच गाडे, आणि ग्रामस्थांनी काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. (वार्ताहर)
संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2016 12:23 AM