जुन्नर : पंचायत राज व सहकारक्षेत्रात सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांनी पथदर्शी काम केले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, शिवाजीरावांनी तालुक्यात सहकार चळवळ व संस्था निर्माण केल्या. माझ्यापेक्षा अधिक काळ शिवाजीरावांनी समाजकारण व राजकारणात घालविला आहे. सुरुवातीला जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी यांच्या विचाराचे शिवाजीराव होते. जिल्ह्यात ग्रामीण भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते प्रणेते होते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे ते साक्षीदार होते. विधानसभेत जागृत सभासद म्हणून त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्रातील पहिल्या पुणे जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. ५५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले. शिवाजीराव यांच्या पूर्णाकृती पुतळा राजकारण व सहकार क्षेत्राला प्रेरणा देणारा आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्राकडे लक्ष देत नाही. परिणामी, शेतमालाच्या किमती घसरतात. राज्या बाहेरील दलाल शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतात. यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. यापुढे शेतकऱ्यांची लूट करता येणार नाही. गरजेनुसार शेती कार्यपद्धतीत बदल करण्याच्या, तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृह उभारण्याची सूचना त्यांनी केल्या.
''गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार सहकार क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. राज्यातील सहकार क्षेत्राला एक वेगळे वळण देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. यासाठी सहकार क्षेत्रात एकत्रितपणे काम करावे लागेल. शासनावर अवलंबून न राहता काम करावे लागेल.''
''राज्यात बाजार समिती अधिक सक्षम करने गरजेचे असून शेती प्रक्रिया उद्योग, शेतमाल साठवणुकीसाठी शीतगृह उभारण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सहकार व पणन मंत्री सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले.''
यावेळी आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला ताई पानसरे, माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, नगराध्यक्ष श्याम पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या वेळी उपस्थित होते.