पुणे - "छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य जगासाठी भूषणावह आहे.शिवरायांसह त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या लढलेल्या शिलेदारांचे कार्य व खरा इतिहास नव्या पिढीसोबतच सर्वांनाच माहिती होणे आवश्यक आहे. त्यांच्या कायार्चा आदर्श घेऊन काम केल्यास खर्या अथार्ने शिवरायांना अभिवादन ठरेल," असे मत तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विश्रांतवाडी परिसरातील विविध मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, रायबाचे सहकारी हर्षवर्धन घोरपडे, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.
रायबा मालुसरे म्हणाले , छत्रपती शिवरायांसह सर्वच महापुरुषांच्या आदर्श जीवनकायार्चा नव्या पिढीसह सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ जयघोष आणि धांगडधिग्यापेक्षा त्यांच्या विचारधारेवर काम होणे आवश्यक आहे. या निमित्ताने रायबा मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वपूर्ण आठवण कथन केली. कोंढाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे लढाईत धारातीर्थी पडल्यानंतर त्यांचा देह राजगड येथे आणण्यात आला. या ठिकाणी छत्रपतींनी स्वत:च्या गळ्यातील "राजमाळ" तानाजींच्या पार्थिवावर अर्पण केली. ती "राजमाळ" आजही मालुसरे कुटुंबाकडे सन्मानपूर्वक जतन करून ठेवण्यात आली आहे. यावेळी रायबा मालुसरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली. त्यांच्या आई डॉ. शितल मालुसरे यांनी "नरवीर तानाजी मालुसरे व शिवशाही "या विषयावर पीएचडी मिळवली असून रायबा यांनी मुंबई विद्यापीठातून संगणक अभियंता पदवी मिळवली आहे.सध्या पिंपरी येथील आयबीएम महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत.
चंदगड येथील पारगड किल्ला येथे तानाजी यांचे पुत्र रायबा यांची समाधी असून मालुसरे कुटुंबीयांच्या वतीने होळी, माघ पौर्णिमा, दीपोत्सव असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, रायबाचे सहकारी हर्षवर्धन घोरपडे, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.