पुणे : मी पूर्वी शिवसैनिक होतो आणि सवयीप्रमाणे गांधींना शिव्या द्यायचो. एकदा आमचे पटेल सर म्हणाले, महात्मा गांधींना रोज अनेक पत्रे येत. लोक अगदी कौटुंबिक अडीअडचणी पत्रातून सांगायचे. गांधींचे मोठेपण हे की ते प्रत्येकाला किमान एक ओळीचे तरी उत्तर द्यायचे. गांधींनी सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण केला, असा विश्वास तुम्ही निर्माण करू शकता का, ते पाहा. या उदाहरणामुळे जीवन बदलले आणि सेवादलाकडे वळलो. विरोधातून कामाला बळ मिळते... क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कायकर्त्यांना कामाचा मूलमंत्र दिला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. स्नेहालय संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते आनंददायी शिक्षण देणाऱ्या आनंदनिकेतन या नाशिक येथील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांना आणि संघषार्तून तृतीयपंथी कवयित्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली दिशा शेख यांना ‘संघर्ष सन्मान’ प्रदान करण्यात आला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाकूर आणि दिशा यांच्या घेतलेल्या मुलाखत प्रत्येकाला अंतर्मुख करून गेली. याप्रसंगी मुक्तांगणचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी आणि विश्वस्त मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी अनिता अवचट यांच्या आठवणींना उजाळा दिला.समाजात अगदीच काही घडत नाही असे मी म्हणणार नाही. बदल होत आहे. बदल होण्याची गती संथ आहे; पण कार्यकर्त्यांनी आपल्या हयातीत परिवर्तन झाले पाहिजे हा अतिउत्साह जरा कमी केला पाहिजे. क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, याकडे अरुण ठाकूर यांनी लक्ष वेधले.
समाजव्यवस्थेवर ताशेरेदिशा शेख यांनी तृतीयपंथी यांचे आयुष्य मांडताना समाजव्यवस्थेवरही ताशेरे ओढले. कोण कसं राहतं यापेक्षा तू कशी आहेस, असे विचारले पाहिजे. धर्म व माणूस यांच्या निर्मितीपासून आम्ही आहोत तिथेच आहोत. आमच्या समाजाचे सोयीचे दैवतीकरण केले आहे. विवाहसंस्था ही मुळातच शोषणव्यवस्था आहे. आमच्या समाजाच्या लैंगिक स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालेले नाही. आमची लैंगिकता स्वीकारण्याची धमक पुरुष किंवा स्त्रियांमध्ये नाही. मला लोक मिठी मारतात. गोड बोलतात; पण रस्त्यावर टाळी वाजवून भिक मागणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या प्रेमाची गरज आहे, अशा शब्दातं दिशा यांनी समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले.