पिरंगुट : आपल्या देशाला अनेक शास्त्रज्ञांमुळे विज्ञानात खूप मोठी झेप घेता आली. जगात आपल्या देशाचे नाव शास्त्रज्ञांमुळे उंचावले आहे. असेच काम विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. फक्त पैशांच्या मागे न धावता समाजासाठी आणि देशासाठी काम करायला हवे, असे आवाहन ‘एनसीएल’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. रोडे यांनी केले.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शाखांमध्ये मराठी दिन व विज्ञान दिन ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा प्रारंभ हा पेरिविंकल स्कूलच्या बावधन शाखेमध्ये विज्ञान यज्ञ प्रज्वलित करून करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करून विज्ञानगीताने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ रोडे, माजी प्रसिद्ध सिनेअभिनेते निळू फुले यांचे जावई प्रसन्न जोशी तसेच निळू फुले यांचे पुतणे बिपीन फुले, मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संस्थेच्या संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख रुचिरा खानविलकर, निर्मल पंडित उपस्थित होते.
राजेंद्र बांदल यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगून नील आर्मस्ट्रॉंग यांच्यावर आधारित अनेकांना माहीत नसलेली सत्यकथा सांगितली. रेखा बांदल यांनी मराठी दिनावर उत्स्फूर्तपणे 'मराठी भाषेची श्रीमंती' ही कविता सादर केली.
नियोजन मुख्याध्यपिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली कलाशिक्षिका नीता पवार यांनी केले होते.
-----------------------------------
फोटो ओळ : पेरिविंकल स्कूलमध्ये मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.