पुणे : आम्ही भाडेकरू म्हणून राहातो. पगार वेळेत मिळाला नाही तर मालकाला भाडं कुठून देणार? माझ्या मुलाला डेंग्यू झालाय, पण पगारच नाही तर त्याचे उपचार कुठून करणार? या व्यथा आहेत, केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याअंतर्गत येणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या. गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळण्यास विलंब होत असल्यामुळे ‘सांगा जगायचं कसं? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. एफटीआयआयच्या विविध विभागांमध्ये जवळपास १७५ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली आहे. दिल्ली येथील ओरियन सिक्युरिटी सोल्यूशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून त्यांना पगाराची रक्कम दिली जाते. कर्मचाºयांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यास विलंब होत आहे. महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी अद्याप कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडलेला नाही.अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. मात्र खरेदी करण्याकरिताही पैसे नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.दिल्लीस्थित ही कंपनी असल्याने दाद तरी कुणाकडं मागायची? असा प्रश्न आहे. एफटीआयआयच्या संचालकांकडून कोणतही सहकार्य मिळत नाही. प्रशासनाकडे चौकशी केली असता ‘तुम्ही कंत्राटी कामगार आहात, तुम्ही एफटीआयआयचे कर्मचारी नसल्याने तुमच्या पगाराची जबाबदारी प्रशासनाची नाही’असे सांगण्यात येते. मग करायचं तरी काय? अशा पेचात आम्ही अडकलो आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याने कॉँट्रॅक्ट आणि पगाराबाबत विचारणा केली तर कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नोकरीवरून काढून टाकण्याची भाषा केली जाते. एखाद्या महिन्याचा प्रश्न असता तर आम्ही समजू शकलो असतो. पण हे आता प्रत्येक महिन्यालाच घडू लागले आहे. आम्ही जोपर्यंत काम बंद आंदोलन करीत नाही. तोपर्यंत आमचा पगार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या महिन्याचा पगारही आम्हाला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळं आम्ही सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहेपूर्वीच्या सिग्मा टेक इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कमही दिलेली नाही. यातच कर्मचाऱ्यांच्या ओव्हर टाईमची रक्कम १५७ रूपयांवरून ८० रूपयांवर आणली आहे. मात्र ही रक्कमही तीन महिने मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पगाराच्या विलंबामुळे एफटीआयआय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 7:30 PM
गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळण्यास विलंब होत असल्यामुळे ‘सांगा जगायचं कसं? असा प्रश्न...
ठळक मुद्देएफटीआयआयच्या विविध विभागांमध्ये जवळपास १७५ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक कर्मचाऱ्यांच्या ओव्हर टाईमची रक्कम १५७ रूपयांवरून ८० रूपयांवर आणली