लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फळे, भाजीपाला बाजाराच्या आत घेतलेल्या पे अँड पार्क निर्णयाच्या अंमलबजावणीच्या विरोधात सोमवारपासून (दि. ३१) बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने दिला आहे. बाजार समितीने बळजबरीने हा निर्णय बुधवारपासूनच (दि. २६) लादल्यास या निर्णयाच्या अंमलबजावणी केल्याक्षणी काम बंद करण्याचा निर्णय अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने घेतला आहे.
बाजारातील भारतीय कामगार सेना, हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियन, टेम्पो पंचायत, तोलणार संघटना, महाराष्ट्र टेम्पो संघटना, महात्मा फुले कामगार संघटना आदी संघटनांच्या प्रतिनिधींची आज मार्केट यार्डात बैठक झाली. या बैठकीत पार्किंग शुल्क वसुल करता क्षणी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री, पणन संचालक, जिल्हाधिकारी आदींना टेम्पो पंचायतचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी निवेदन दिले आहे.