लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयात कार्यरत परिचारिकांच्या वेतनात मोठी तफावत आहे. कोरोना काळात सर्व परिचारिकांच्या कामाचे स्वरूप सारखेच असले तरी वेतनात दुपटीहून अधिक फरक असल्याने परिचारिकांमध्ये नाराजी आहे. चार ते पाच वर्षांपासून काम करणाऱ्या परिचारिकांपेक्षा अडीच पट वेतन कंत्राटी परिचारिकांना मिळत आहे.
शहरात कोरोनाचा शिरकाव होण्यापुर्वीपासून महापालिकेच्या रुग्णालयांत कायम सेवेतील परिचारिकांसह राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेतील परिचारिका कार्यरत आहेत. योजनेतील परिचारिकांचे सध्याचे वेतन केवळ आठ हजार रुपये आहे. त्याव्यतिरिक्त अन्य कोणते भत्तेही त्यांना मिळत नाहीत. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत गेल्यानंतर नायडू रुग्णालयासह कोविड केंद्रांमध्ये परिचारिकांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे सहा महिन्यांसाठी काही कंत्राटी परिचारिकांची भरती करण्यात आली. त्यांना २० हजारांहून अधिक वेतन देण्यात आले. तेव्हापासून एकाच रुग्णालयात तीन वेगवेगळ्या वेतनाच्या परिचारिका काम करत आहेत.
मागील चार वर्षांपासून कार्यरत एक परिचारिका म्हणाल्या की, नव्याने घेतलेल्या परिचारिकांना अधिक वेतन दिल्याबद्दल आमची नाराजी नाही. तेवढे वेतन मिळायलाच हवे. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. कोरोना काळात आम्हीही सर्वांच्या बरोबरीने काम केले. वेतनवाढीच्या मागणीनंतर हाती केवळ आश्वासन मिळाले. तसेच पूर्वी ११ महिन्यांचा असलेला करार आता सहा महिन्यांवर आणला. पूर्णवेळ परिचारिका व आमच्या वेतनात पाच पटीहून अधिक फरक आहे. ही आर्थिक पिळवणूक नाही का, असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करण्यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ही त्रुटी दुर झाल्यास त्यांचे मानधन वाढणार आहे. तसेच त्यांनी आऊटसोर्सिंग थांबविण्याची मागणीही केली आहे. पुणे महापालिकेच्या सेवेतील परिचारिकांच्या वेतनातही मोठी तफावत आहे. कोरोना काळात त्यांना वेतनवाढीचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.
----------
वेतन कपात अन विलंबही
नायडू मधील कायम सेवेतील परिचरिकांच्या वेतनात सुरुवातीचा एक महिना २५ टक्के कपात करण्यात आली होती. तर कंत्राटी परिचरिकांचे वेतन अनियमितपणे दिले जात आहे, असे परिचरिकांनी सांगितले.
---------