लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वडगावशेरीतील साईनाथ नगर येथील जुना मुंढवा रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने भाजी मंडई बांधण्याचे २०१७ पासून काम सुरु होते. मात्र हे काम अर्धवट पडून होते. याचा ‘लोकमत’ने पाठपुरवावा केल्याने अखेर दोन वर्षांनी मंडईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे दीड कोटी खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे.
नुकतीच या कामाची पाहणी नगरसेवक संदीप जऱ्हाड, विकेंद्रीत कामे परिमंडळ १ चे कार्यकारी अभियंता राजेश बनकर, सहउपायुक्त सुहास जगताप, कनिष्ठ अभियंता महादेव बोबडे, ज्ञानेश्वर लाखे, प्रवीण सातव, स्वप्नील कांबळे, बालाजी हुस आणि नागरिकांनी केली.
या मंडईचे काम अधर्वट अवस्थेत असल्याने याला कचरा डेपोचे स्वरुप आले होते. ही बाब ‘लोकमत’ने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशात आणली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. स्थानिक नगरसेवक जऱ्हाड यांनी निधी मंजूर करून घेण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आता गाळे उपलब्ध होऊ शकणार आहेत. या इमारतीत केवळ भाजी मंडई नसून दुसऱ्या मजल्यावर बहुउदेशीय दालन बांधण्यात आले आहे. हे दालन मोठे असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता येणार आहेत.
चौकट
एकूण ८ गुंठ्यांमध्ये मंडई बांधण्यात आली आहे. पाण्याची टाकी बांधण्यात आली असून स्वच्छतागृहही आहे. या दालनात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता येणार आहेत.
कोट
“मंडईचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. सुरुवातीला सभागृहाचे नियोजन नव्हते. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह बांधकाम विभागाच्या मंजूरीने बांधण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना ते शुभकार्यासाठी उपलब्ध होणार आहे.
- संदीप जऱ्हाड, स्थानिक नगरसेवक.