लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : आमच्या घरचे लोक नोकऱ्या नसल्याने दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करतात, शेतीला पाणी घेण्यासाठी पाणी परवाने नाहीत, लाभक्षेत्राचे शिक्के काढले नाहीत असा समस्यांचा पाढा वाचीत आमचे आंदोलन आता आम्हीच करणार आहोत, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची शेतकऱ्यांपुढे एक भूमिका आणि अधिकाऱ्यांपुढे वेगळी भूमिका असे सूत्र आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही. हे आंदोलन आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे, असे स्पष्ट मत भामा-आसखेडच्या जलवाहिनीविरोधातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेड तालुक्यातील भामा- आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरदेखील या मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम अडविले होते त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांच्यात सामंजस्य राहावे म्हणून चाकण पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.या वेळी सत्यवान नवले, बाळासाहेब लिंभोरे पाटील, पाटील लिंभोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित कोळेकर, संजय कोळेकर, किसन नवले, सुखराज लिंभोरे पाटील, तानाजी नवले, भीमराव नवले, गोविंद गोपाळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस ठाण्याचे मनोज यादव, पुणे महानगरपालिकेचे उपअभियंता एस. एन. कुलकर्णी, मुकुंद बर्वे, के. एच. लखानी, राजेश भूतकर, शेखर कुलकर्णी आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.सगळे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. ट्रॅक्टर मोर्चामधील एकही नेता आज आमच्याबरोबर नाही. तालुक्याचे आमदार इकडे शेतकऱ्यांबरोबर असल्याचे सांगत असून दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास सांगत आहेत, असा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी अशी दुटप्पी भूमिका सोडावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला.
जलवाहिनीचे काम बंद म्हणजे बंदच
By admin | Published: June 25, 2017 4:40 AM