स्टार डमी ११३५
आठ महिन्यांत २५ हजारांना मिळाला रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, खाजगी कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने लाखो लोकांना बेरोजगार होण्याची वेळ आली. यामुळेच स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात रोजगार मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ४१ हजार ५५१ तरुण-तरुणींने रोजगार मिळण्यासाठी अर्ज केले. यात जिल्ह्यात एमआयडीसीतील कंपन्या, स्वयंरोजगार केंद्राकडून दर महिन्याला घेण्यात येणारे रोजगार मेळावे यामुळे आठ महिन्यांतच २५ हजार ७५४ जणांना रोजगार देखील उपलब्ध झाला.
पुणे जिल्ह्यात संपूर्ण राज्यातून बेरोजगार तरुण रोजगारासाठी येत असतात. पुण्यातील आय.टी क्षेत्रासह, एमआयडीसी, हाॅटेल व्यवसायासह, मार्केट व इतर अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच उद्योग-व्यवसायाची घडी विस्कळीत झाली आहे. यामुळेच हजारो-लाखो लोकांना बेरोजगार होण्याची वेळ आली. परंतु जिल्हा स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने या बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. केंद्राकडे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रोजगाराची संधी असल्यास कळविण्यात येते. दर महिन्याला रोजगार मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामुळेच आठ महिन्यांत जिल्ह्यात २५ हजार ७५४ लोकांना रोजगार मिळाला.