सांगवी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागात ग्रामआपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समितीने संशयित रुग्णांची वेळीच तपासणी करून ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी केले.
सांगवी (ता. बारामती) येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. मार्गदर्शन करताना काळभोर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी देखील व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, किरण तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, उपसरपंच अनिल काळे, विजय तावरे, प्रणव तावरे, तलाठी अंकुश भगत, रतनकुमार भोसले, वैद्यकीय अधिकारी जनार्दन सोरटे, ग्रामसेवक संदीप सोडमिसे उपस्थित होते.
अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरित्या काम केले. यामुळे कोरोनाच्या रुग्णांत घट झाली, परंतु पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे ग्रामआपत्ती समित्या कार्यान्वित करण्याची गरज आहे. अनेक गावांतून ग्रामआपत्ती समितीने चांगल्या प्रकारे काम केल्याने त्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्रामआपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. बाहेरून येणारे, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. ग्रामआपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. तर कृषी साहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा आहे. कोरोना नियंत्रणासाठी सर्वच नागरिकांनी काळजी अन् पुढाकार घेऊन पुन्हा आपत्ती समित्या सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सांगवीत रुग्णसंख्या वाढत असल्याने गाव हॉटस्पॉट घोषित केले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वांनी कामकाज चांगले केले आहे. संशयित लोकांकडे दुर्लक्ष करू नका. जास्तीत जास्त कोरोना टेस्टिंग, ट्रेसिंग आणि उपचार हे तिसरी लाट रोखण्यासाठी त्रिसूत्रीकरण महत्त्वाचे आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास लवकर तपासणी करा. यामुळे बेड, इंजेक्शन व ऑक्सिजनची गरज भासणार नाही. यामुळे तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले.