एकनिष्ठ राहून काम केले; मात्र काँग्रेसने ताकद न देता कायम डावलले, थोपटेंची पक्षाबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:08 IST2025-04-21T15:06:33+5:302025-04-21T15:08:15+5:30

राज्यात भाजपचे सरकार असून भोर मतदारसंघात विकासकामांना गती देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे

Worked with loyalty but Congress kept ignoring them without giving them strength sangram thopte is unhappy with the party | एकनिष्ठ राहून काम केले; मात्र काँग्रेसने ताकद न देता कायम डावलले, थोपटेंची पक्षाबाबत नाराजी

एकनिष्ठ राहून काम केले; मात्र काँग्रेसने ताकद न देता कायम डावलले, थोपटेंची पक्षाबाबत नाराजी

भोर : मागील ५७ वर्षे वडील आणि त्यानंतर मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. मात्र काँग्रेसने कधीही ताकत दिली नाही. उलट कायम डावलले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्ष सोडण्याची वेळ कॉंग्रेसने आणली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि भोर विधानसभा मतदारसंघातील अपूर्ण राहिलेले रोजगार, उपसा योजना, गडकिल्ल्याचे संवर्धन भोर, वेल्हे व मुळशी पर्यटन तालुके जाहीर करून सर्वागीण विकासासाठी भाजपत जाणार आहे, असे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. म्हणून कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर मतदारसंघात विकासकामांना गती द्यायची असेल तर भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. माझी वैयक्तिक भूमिका मी सुरुवातीलाच स्पष्ट केली होती, की कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय घेईल. आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मी भाजपमध्ये प्रवेश करावा. मंगळवारी (दि. २२) माझा पक्षप्रवेश होईल. या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण उपस्थित असतील, असेही थोपटे यांनी म्हटलं आहे. रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे पत्रकार परिषदेत आमदार संग्राम थोपटे बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, जिल्हा परिषद माजी सदस्य विठ्ठल आवाळे, युवक अध्यक्ष महेश टापरे, अभिषेक येलगुडे, लहू शेलार, प्रमोद कुलकर्णी, नितीन बांदल उपस्थित होते.

 कोण आहे थोपटे घराणे ? 

१९७२ साली अनंतराव थोपटे अपक्ष म्हणून प्रथम आमदार झाले त्यानंतर १९८०, १९८५, १९९०, १९९५, २०४ सहावेळा आमदार झाले. काँग्रेसच्या सरकार मध्ये १४ वर्ष १९९२ पर्यंत विविध खात्यांचे कँबिनेटमंत्री म्हणून काम केले. राज्यासह पुणे जिल्ह्यावर थोपटे यांची मजबूत पकड होती शहरासह ग्रामीण भागात काँग्रेस वाढवण्यात मोठे योगदान होते. २००९ ते २०१९ तीन वेळा संग्राम थोपटे आमदार झाले. जिल्हा राष्ट्रवादीमय होत असताना हातात सत्ता नसतानाही काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम संग्राम थोपटे यांनी केले. मात्र काँग्रेसने सतत डावलल्याने अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन भाजपत प्रवेश करणार आहेत यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असून, जिल्ह्यात काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यात थोपटे घराण्याचे मोठे योगदान आहे; मात्र सत्ता असताना काँग्रेसने सतत डावलले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून, विकासासाठी आम्ही भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. - शैलेश सोनवणे, अध्यक्ष, भोर तालुका काँग्रेस

Web Title: Worked with loyalty but Congress kept ignoring them without giving them strength sangram thopte is unhappy with the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.