पुणे : निवडणुका जिंकणे किंवा सत्तेवर येणे हे भारतीय जनता पक्षाचे अंतिम ध्येय नाही तर ‘एकात्म मानव दर्शन’च्या विचारसरणीवर ‘भारतमातेला’ विश्वारूढ करणे हे पक्षाचे उद्दिष्ट आहे. या कार्यासाठी स्वत:चा विचार न करता पक्षाच्या विचारधारेवर देशाला पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता पक्षाला हवा आहे, त्यामुळे स्वत:चे व्यक्तित्व सुधारण्याचा प्रयत्न करा, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच ‘कान टोचले.’ पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी व एकात्म मानव दर्शन सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकच्या वतीने ‘राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय’ या विशेष ग्रंथाचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, स्वामी गोविंदगिरी महाराज तसेच दिलीप करंबळेकर, साप्ताहिक विवेकचे रमेश पतंगे उपस्थित होते. जनसंघ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या योगदानावर भाष्य करताना अमित शहा यांनी पुनश्च ‘काँग्रेस’ला लक्ष्य केले. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये केवळ काँग्रेसच्या विचारधारेचे लोक नव्हते़ विविध विचारसरणीच्या व्यक्तींच्या सहभागातून स्वातंत्र्याची पहाट उगवली, मात्र स्वातंत्र्यप्राप्तीचे श्रेय केवळ काँग्रेसने घेतले़ स्वातंत्र्याचा इतिहास चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका लक्षात आल्यावर दहा लोकांनी मूल्यधिष्ठित विचारसरणीच्या आधारावर जनसंघाची निर्मिती केली़ त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा प्रामुख्याने समावेश होता़ नेहरू देशाचे ‘नवनिर्माण’ करू पाहत होते, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘पुनर्निर्माण’ करण्याचा प्रयत्न करीत होते. ‘एकात्म मानव दर्शन’ या देशाच्या संस्कृतीला जोडणाऱ्या विचारसरणीवर देशाची वाटचाल होणार आहे. एकात्म विचार दर्शन हे शाश्वत आहे, जे कधीही कालबाह्य होणार नाही. याच विचारसरणीवर पक्ष काम करीत आहे.’’ राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
पक्षाच्या विचारधारेशी जोडलेला कार्यकर्ता हवा
By admin | Published: June 06, 2016 12:46 AM