पुण्यातल्या गंज पेठेत काल रात्री एका गोडाउन मध्ये आग लागुन एका माणसाचा मृत्यू झाला. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही कोरोना पॅाझिटिव्ह असल्याचे आढळल्याने आता फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांमधे घबराट पसरली आहे.
पुण्यात काल मध्यराञी गंज पेठ, मासेआळी येथे भंगार माल असणारया दुकानात लागलेल्या आगीमधे एक इसम भाजल्याने गंभीर जखमी झाला होता. अग्निशमन विभागाने या ठिकाणी १० फायरमन पाठवले. तसेच एक टॅंकर पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आल्या नंतर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी या व्यक्तीची कोरोना चाचणी केल्यानंतर पॅाझिटिव्ह असल्याचे आढळले. यामुळे आता या ठिकाणी हजर असलेल्या फायरमनच्या काळजीत वाढ झाली आहे. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
महात्मा फुले गंज पेठ येथील मासेआळी कॉर्नर जवळ “आर. के. स्क्रॅप सेंटर आहे. हे स्क्रॅप सेंटर रोहित वासुदेव कुदाराम यांचे आहे. पुढच्या बाजूला छोटे दुकान आहे. तर पाठीमागे ४०० स्केअरफूटमध्ये गोडाऊन आहे. येथे शिवकांत हा काम करत होता. प्लास्टिक आणि तेलाचे डब्बे विकत घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, गुरुवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानक नागरिकांना कामगाराचा ओरडण्याचा आवाज आला. तो ओरडला त्यावेळी आग नव्हती, असे नागरिकांनी अग्निशमन दलाला सांगितले. पण नंतर काही वेळातच आग लागल्याचे दिसून आले. मग त्यांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानंतर मध्यवर्ती अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन दाखल झाले. ५ ते १० मिनिटात ही आग आटोक्यात आणली. पण आत जाऊन पाहिल्यानंतर एक कामगार आगीत होरपळल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, जवान राहुल नलावडे, सपकाळ, देवकुळे, देवदूतचे शिर्के, कार्ले या जवान यांनी ही आग आटोक्यात आणत कामगिरी केली आहे.