पुणे : बाणेरमध्ये सुरू असलेल्या वृंदानंद ब्लिस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला जीव गमवावा लागला. अजित वरुणलाल बघेल (वय २५) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, साइट इंजिनीअर आणि प्रकल्प व्यवस्थापक या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक उत्तम रमणिकभाई मकवाना यांच्यासह ठेकेदार, साइट इंजिनीअर आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाणेरपोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक शिवाजी आदिनाथ राहिगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, मृत मजूर हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. तो गेल्या वर्षभरापासून या साइटवर काम करीत होता. मंगळवारी (दि. १०) सकाळी १०:३० वाजता वृंदानंद ब्लिस इमारतीच्या सातव्या मजल्यावर तो काम करीत होता. काम करताना त्याचा तोल गेला आणि जमिनीवर पडला. उंच ठिकाणी जोखमीचे काम करताना सुरक्षितता जाळ्या किंवा त्यासंबंधी सुरक्षा प्रोटोकॉल साइटवर उपलब्ध करून दिले नव्हते. त्यामुळे हा प्राणघातक अपघात झाला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक रूपेश चोळके यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत बांधकाम साइटवर बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. बांधकाम साइट्सवरील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे. तथापि, बाणेरमधील साइटसह अनेक साइट या मूलभूत गोष्टींची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरल्याने अपघात घडत आहेत.