पिंपरी : भूमिगत विद्युत वाहिनीची कल्पना न आल्याने खोदकाम करत असलेल्या एका कामगाराला शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोयते वस्ती, पुनावळे येथे घडली. गोपाळ बालाप्पा आय्याळी (वय २१, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी रवी कोटरप्पा बजलवार (वय २५, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वाघेरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), सिद्धेश महादेव तांडेल (वय २७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा गोपाळ हा सोमवारी कोयते वस्ती, पुनावळे येथे खोदकाम करत होता. त्यासाठी महावितरण कार्यालयाची खोदकाम करण्यासाठी परवानगी घेतली नाही. तसेच आरोपींनी गोपाळ याला भूमिगत विद्युत वाहिनीची माहिती दिली नाही. त्यामुळे खोदकाम करताना विजेचा धक्का लागून गोपाळचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.