विमाननगर : वडगाव शेरी पम्पिंग स्टेशन आवारातील पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची स्टोअर रूम एका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनीच भाड्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. भामा आसखेड योजनेसाठी करण्यात येणाऱ्या भूमिगत जलवाहिनीसाठीच्या ठेकेदारांच्या कामगारांना ही स्टोअररूम भाडयाने देण्यात आली होती. तब्बल तीन महिन्यांनी हा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. स्टोअर रूमचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेकेदाराच्या कामगारांना भाड्याने देण्याचा प्रताप पंपिंग स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने केला. दमदाटी व दहशतीच्या नावाखाली अनेक धंदे या कर्मचाऱ्याने पंपिंग स्टेशनच्या आवारात सर्रास सुरू केले होते. स्टोअर रूम भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सदर कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे .मात्र, याप्रकरणी आता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले असून चौकशी करून कारवाई करू अशी माहिती यावेळी दिली.पुणे महापालिकेच्या वडगावशेरी पंपिंग स्टेशनमध्ये भामा आसखेड योजनेची जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठेकेदारामार्फत सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी जुना ठेकेदार बदलल्याने नवीन ठेकेदाराने काम सुरू केले आहे .याठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या एका कर्मचाऱ्याने चक्क या कामगारांना स्टोअर रुम भाड्याने दिली. गेली तीन महिने हा कर्मचारी दोन हजार रुपये प्रमाणे रक्कम या कामगारांकडून वसूल करत होता. या कर्मचाऱ्याने स्टोअर रूमचे कुलूप तोडून या कामगारांना आतमध्ये राहायला जागा दिली होती. हा गंभीर प्रकार नुकताच अधिकाऱ्याने भेट दिल्यावर या स्टोरमध्ये कामगार राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता शिवानंद अंकोलेकर यांच्याशी संपर्क साधला असता,वडगाव शेरी पम्पिंग स्टेशन आवारातील स्टोअररूम काही बाहेरील व्यक्ती वापरत असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे .याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती यावेळी दिली. मात्र, गेली तीन महिने महापालिकेची स्टोअररूम भाड्याने देण्याचा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांकडून कसा लक्षात आला नाही हा प्रश्न यातून उपस्थित होतो . त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .
कर्मचाऱ्यानेच केला पालिकेची स्टोररूम भाडेतत्वावर देण्याचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 2:30 PM
गेली तीन महिने हा कर्मचारी दोन हजार रुपये प्रमाणे रक्कम या कामगारांकडून वसूल करत होता. या कर्मचाऱ्याने स्टोअर रूमचे कुलूप तोडून या कामगारांना आतमध्ये राहायला जागा दिली होती.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे कानावर हात, चौकशी करून करणार कारवाई